नेवासा : पत्नीचा खून करुन मृतदेह शेताच्या बांधावर पुरल्याची घटना नेवासा येथे घडली. या विवाहितेचा पती पाच वर्षाच्या मुलासह बेपत्ता आहे. मयत विवाहितेचा मामा काशिनाथ माळी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलीस सूत्राने सांगितले, नेवासा बुद्रुक येथील सुमन हिचा विवाह चार वर्षापूर्वी तालुक्यातील गोंडेगाव येथील संतोष बाळू माळी याच्याबरोबर झाला होता. संतोष दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करीत असे. सुमन हिला अडीच वर्षाची कोमल मुलगी व पाच महिन्याचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. काही महिन्यापूर्वी सुमन हिला पतीने मारहाण केल्याने ती रागाने नेवासा बुद्रुक येथे अपंग आई व मामाकडे आली होती. काही दिवसानंतर पती संतोष पत्नीला घेण्यासाठी नेवासा बुद्रुकला आला. पत्नीला आपल्यासोबत न पाठविल्यास तिचा खून करीन, असा दमही त्याने दिला होता. त्यानंतर सुमनला नांदविण्यास पाठविण्यात आले.दोन दिवसापूर्वी मामा काशिनाथ माळी यांना सुमन दिसत नसल्याने संशय आला. त्यांनी सोळा जून रोजी सुमनच्या सासरी जाऊन खात्री केली. सुमन घरी नसल्याचे पाहून त्यांनी सुमन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. व त्यांनी सुमनचा नातेवाईकांसह शोध घेतला. त्यावेळी त्यांना घराजवळील बांधावर मातीचा उंचवटा दिसला. संशय बळावल्याने मामाने नेवासा पोलीस ठाणे गाठून सुमन हिच्या घातपाताविषयी संशय व्यक्त केला. नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे, तहसीलदार हेमा बडे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने जागा खणली असता हाडाचा सांगाडा आढळून आला. नेवासा पोलिसांनी याबाबत सुमन हिचा पती संतोष माळी याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून सांगाडा तपासणीसाठी औरंगाबादला पाठविला आहे. सुमन हिची मुलगी कोमल आजीकडे असून पाच महिन्याचा मुलगा बेपत्ता आहे. बेपत्ता आरोपी संतोष याच्यासोबत हा मुलगा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. (तालुका प्रतिनिधी)
पत्नीचा खून करुन मृतदेह बांधावर पुरला
By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST