तालुक्यातील मढी खुर्द येथील सुवर्णा विजय गवळी हिने आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला १४ मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेची पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सखोल चौकशी केली असता ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे समोर आले. याबाबत हेड कॉन्स्टेबल अमर गवसने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा हिचे व तिचा पती विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी यांच्यामध्ये १३ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भांडण झाले. यावेळी विजय याने सुवर्णा हिच्या डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टणक वस्तूने मारून ठार मारले. त्यानंतर मृत शरीरावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले. त्यानंतर तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व सुवर्णा हिने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाइकांना देऊन पुरावा नष्ट केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
आत्महत्या नव्हे, पतीनेच केला तिचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST