कर्जत : अनैतिक संबंधामुळे पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार कर्जत पोलिसांनी जवळपास ११ महिन्यांनंतर उघड केला. याप्रकरणी एक महिला व तिचा प्रियकर योगेश बावडकर यांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील तिखी येथील प्रमोद बाळासाहेब कोरडे याचा नगर शहराजवळील विळद घाट येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना २ मार्च २०२० रोजी मृत्यू झाला होता. या तपासात मृताच्या पत्नीने सुरुवातीस पतीचा मृत्यू हा आजारपण, अतिमद्यप्राशनाने कोमात गेल्याने झाला, असे पोलिसांना सांगितले. पतीच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद होती. मृतदेहास बाहेरून दिसणाऱ्या जखमा नव्हत्या. मात्र संबंधित महिलेचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे पोलिसांनी ती राहत असलेल्या परिसरात गोपनीय माहिती घेतली. त्यातून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. पुराव्यासाठी मृताचे वैद्यकीय अहवाल नाशिक आणि पुणे येथून प्राप्त केले. त्यातून कोरडे यांचा मृत्यू डोक्यात मारल्यामुळे झाल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित महिला आणि तिचा प्रियकर योगेश बाळासाहेब बावडकर (वय ३५, रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. त्यांच्या संबंधामध्ये पती अडसर ठरत असल्याने दोघांनी संगनमताने प्रमोद कोरडे याच्या डोक्यात फुकणीने (फुकारी) प्रहार आणि मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे, असे यादव यांनी सांगितले.
मृताचा भाऊ श्रीकांत कोरडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने माहिती लपवून ठेवली, असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस सब-इन्स्पेक्टर अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार शबनम शेख, भाऊसाहेब यमगर, महादेव कोहक, गोवर्धन कदम, श्याम जाधव, अमित बरडे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास अमरजित मोरे करीत आहेत.