देवदैठण : गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी, त्यानंतरचे लॉकडाऊन, बंद असलेल्या शाळा यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. हे ओळखून श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व परिसरातील उच्च शिक्षित तरुण-तरुणींनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एकत्र येत वीचीज फाउंडेशनची स्थापना करून नवचेतना उपक्रमांतर्गत तीन महिन्यांपासून मोफत ऑनलाइन ज्ञानदान करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले आहेत.
प्रांजली बोरुडे (देवदैठण), पालवी शिर्के (श्रीगोंदा), महेश डेडे (पुणे), शंकर शिंदे (नगर) या एम.एस्सी शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे दररोज मोफत ऑनलाइन अभ्यास घेत आहेत. त्यांना देवदैठणचे मनीष जाधव, अनिकेत धोत्रे, सुहास शेळके हे मदत करत आहेत. परिसरातील विद्यार्थी व पालक नवचेतना या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत आहेत.
----
कोरोनामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा, कोचिंग क्लासेस सुरू होण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही. या विद्यार्थ्यांचा वेळ आणि शिक्षण दोन्हीही अमूल्य गोष्टी आहेत. वीचीज फाउंडेशनने त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा दैनंदिन उपक्रम हाती घेऊन शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला.
- प्रांजली बोरुडे,
संस्थापक, वीचीज फाउंडेशन,
देवदैठण