अहमदनगर : वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे़ तापमानात वाढ झाली असून, पुढील ४८ तास जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे़ नागरिकांनी उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे़ ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे़ जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडला़ उष्णेत वाढ झाली असून, दुपारच्यावेळी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असतो़ उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे़ ढगाळ वातावरण असतानाच अचानक उष्णतेची लाट आली आहे़ शनिवारी नगरचा पारा ३८ अंशांवर पोहोचला होता़ त्यात रविवार व सोमवारी वाढ होण्याची शक्यता असून, सोमवारी तापमान ४३ अंश असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ नगरसह मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तास उष्णतेची लाट असणार आहे़ त्यामुळे नागरिकांनी उन्हाची काळजी घेणे आवश्यक आहे़ वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे़ भर उन्हात बळीराजा शेतात घाम गाळत आहे़ अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे शेती काम करणे कठीण झाले आहे़ (प्रतिनिधी)
पुढील ४८ तास उष्णतेची लाट
By admin | Updated: May 14, 2016 23:50 IST