अहमदनगर : पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपींनी विविध क्लृप्त्या लढविल्याचे आपण ऐकलेच असेल. जेलमधून आरोपींनी धूम ठोकल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. पण नगर पोलिसांच्या हाती चक्क असा एक आरोपी लागला आहे की तो जेलमध्ये जाण्यासाठीच तो वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतो. अटक होतो. जेलमध्ये जातो आणि जामिन नाकारुन जेलमध्येच मुक्काम ठोकतो. नगर पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने सांगितलेली कहाणी तर चक्रावून टाकणारीच आहे.कोपर्डीच्या आरोपीसंदर्भात जिल्हा कारागृह अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा पीए, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे या आरोपीने फोन केले. या तोतयाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी तपास पथकाची नियुक्ती केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून या तोतयाला ताब्या घेतले. अमित जगन्नाथ कांबळे (वय २१ रा. नवीपेठ, निंबाळकर वाडा, पुणे) असे तरूणाचे नाव आहे. जेलमध्ये गेल्यानंतर अजारपणावर सरकारी खर्चातून उपचार होत असल्याने असे फोन करून अटक होतो, अशी कबुली कांबळे याने पोलीसांकडे दिली आहे. कांबळे याने त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचा दावा केला असून, चार दिवसाला डायलेसिस करावे लागते. जवळ पैसे नाहीत. जेलमध्ये गेल्यानंतर मोफत उपचार मिळतात. त्यामुळे मोठमोठ्या अधिका-यांना बनावट फोन करून गुन्हा करतो आणि अटक होतो असे त्याने सांगितले.२९ नोव्हेंबरला कोपर्डी खटल्यातील आरोपींना जिल्हा न्यायालयात फाशीची शिक्षा झाल्यानंतर या आरोपींना येरवडा कारागृहात हलविण्याची कारागृह प्रशासनाची तयारी सुरू होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अमित कांबळे याने जिल्हा कारागृहात फोन करून मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचे सांगत आरोपींना नागपुरला नव्हे तर तत्काळ येरवडा कारागृहात पाठवा असे फोन करून सांगितले. त्यानंतर काही वेळाने पोलीस अधीक्षक बोलत असल्याचे सांगत व त्यानंतर पोलीस महासंचालक बोलतोय असे म्हणून कोपर्डीच्या आरोपींना येरवडा कारागृहात पाठवा असा फोन केला. याबाबत २ नोव्हेंबर रोजी कारागृह अधीक्षक नवनाथ सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार व त्यांच्या टीमने फोनसाठी वापरलेला मोबाईल क्रमांक आणि ठिकाणाचा तपास करून अखेर या तोतयाचा छडा लावला. पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुठ्ठे, कॉस्टेबल फकीर शेख, दत्ता हिंगडे, रवी सोनटक्के, संदीप घोडके, सचिन कोळेकर, देवा काळे यांच्या पथकाने नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून कांबळे याला अटक केली. वृत्तपत्र वाचून कोपर्डी खटल्याविशयी व निकालाविषयी माहिती मिळाली. पुन्हा जेलमध्ये दाखल होण्यासठी असा फोन केल्याचे कांबळे यांने पोलीसांना सांगितले.
त्याने जामीन नाकारला
तोतयागिरी करणे या गुन्ह्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळतो. अमित कांबळे याने मात्र जामीन घेण्यास नकार दिला आहे. किडनीच्या उपचारासाठी जेलमध्ये राहणे गरजेचे असून, जामीन घेणार नसल्याचे त्याने सांगितले.
पोलीस आयुक्तांनाही फोन
अमित कांबळे याने काही २०१९ मध्ये पुणेचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना एका राजीय पक्षाचा कार्यकर्ता बोलत असल्याचे सांगून शिविगाळ केली होती. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. तसेच पुणे येथील दांडेकर पुलावर पाणी शिरले असल्याचे सांगत अग्नीशमन दलाल फोन करून खोटी माहिती दिल्यानेही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.२०१० पासून बनावटगिरीअमित कांबळे हा पुणे येथील निंबाळकर वाडा परिसरात झोपडपट्टीत मामाच्या छोट्याशा घरात राहतो. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तो पाचवीपर्यंत शिकलेला आहे. बनावट फोन करण्यासाठी तो जस्टडायलवरून शासकीय कार्यालयांचा फोन नंबर घेतो. त्यानंतर फोन करतो.