पारनेर : आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात (कोविड उपचार केंद्र) श्रावण मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे उपचार घेत असलेले ३५० रुग्ण ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
सोमवारी (दि.१६) आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन, दीप प्रज्वलन करून सप्ताहाची व पारायणाची सुरुवात झाली. यावेळी आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, दीपक लंके, डॉ. किरण भुजबळ, सत्यम निमसे, सूरज भुजबळ, संदीप भागवत, दत्ता कोरडे, संतोष ढवळे आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीबरोबरच अध्यात्माची जोड आवश्यक आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर व रुग्णांमध्ये अध्यात्मामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. रुग्णांना आधार मिळतो. संसर्गाबाबत असणारी भीती दूर होते.
सप्ताहात ज्ञानेश्वर दौंडकर, प्रकाश साठे, लक्ष्मण पाटील, समाधान भोजेकर, गोविंद गोरे, सोपान सानप, योगेश शिंदे यांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत. सोमवारी (दि.२३) उमेश दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा, हरिजागर आदी कार्यक्रम होत आहेत.
---
शुक्रवारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन
प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन शुक्रवारी (दि.२०) संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याच्या भावनेतून आमदार लंके व त्यांचे सहकारी करोना संसर्ग काळात अहोरात्र जनतेची सेवा करीत आहेत. आधुनिक उपचार पद्धतीला अध्यात्माची जोड देऊन कोरोनाबाधितांचे मनोबल उंचावण्यात येत आहे, असे ॲड. राहुल झावरे यांनी सांगितले.
-----
१८ नीलेश लंके
भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करताना आमदार नीलेश लंके व मान्यवर.