राजूर येथील ॲड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयात वन्यजीव विभाग नाशिक अंतर्गत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन गाईड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पर्यटन दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या मात्र प्रसिद्धी अभावी दूर असणाऱ्या हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात अनेक रमणीय पर्यटन स्थळे आहेत. येथील नवलाईने नटलेला निसर्ग, पावसाळ्यातील जलोत्सव, नवरात्रीपूर्वी सुरू होणारा फुलोत्सव आणि वसंत ऋतू संपता संपता सुरू होणारा काजवा महोत्सव या परिसराचे वैशिष्ट्य ठरत आहे.
वनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन गाईड प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात विनायक खोत, संदीप देशमुख, विनय वाडेकर, विठ्ठल शेवाळे, अशोक काळे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी युवकांना मार्गदर्शन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत सत्कार केला.