श्रीगोंदा : कुकडीच्या हरितपट्ट्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून जलसंकट उभे राहिले आहे. विहिरी, बोअर आटले असून, फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी टँकरचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची जीवघेणी लढाई सुरू झाली आहे.कुकडीच्या पट्ट्याची उसासाठी सर्वदूर ख्याती आहे, परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून कुकडीच्या पाटपाण्याची शाश्वत हमी न राहिल्याने शेतकऱ्यांनी लिंबोणी, डाळींब, पेरू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष फळबागांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोट्यवधीचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी सुमारे ६ हजार एकरवर फळबागा फुलविल्या आहेत. बहरलेल्या फळबागांमधून शेतकऱ्यांनी भविष्याचा वेध घेत स्वप्न रंगविले होते. मात्र, यंदा महाभयानक दुष्काळात शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुकडी-घोडच्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)
हिरवा पट्टा वाळवंटाच्या मार्गावर
By admin | Updated: February 21, 2016 23:46 IST