संगमनेर : दुग्ध विकास वाढ व दुभत्या जनावरांचे संगोपण करणार्या महिलांचे होणारे श्रम कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ‘मुक्त गाय गोठा’ प्रकल्पाला शासनातर्फे अनुदान देण्याची घोषणा राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकर चव्हाण यांनी केली. जागतिक दुग्ध दिनाच्या मुहूर्तावर तालुक्यातील सावरगाव तळ येथे दूध संघाच्या ‘डेअरी शो-२०१४ व मॉडर्न डेअरी फार्म’ चे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्टÑीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाषचंद्र मांडगे, आमदार डॉ. सुधीर तांबे, भुवनेश्वरी (गुजरात) पीठाचे आचार्य घनश्याम महाराज, प्रोग्रेसीव्ह डेअरी फार्म असोसिएशन (पंजाब)चे अध्यक्ष दलजीतसिंग गिल, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर, माधव कानवडे, रामनाथ रहाणे, रणजीत देशमुख आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांनी नगर जिल्ह्याला विकासाची दिशा दिली. सावरगाव तळमध्ये १२ किलोमीटर लांबून टँकरने पाणी आणून केले जाणारे दुग्ध विकास व फलोत्पादन वाखाणण्यासारखे आहे. महसूलमंत्री थोरात म्हणाले, डेन्मार्क येथे सर्वाधिक दुग्ध उत्पादन होते. छोट्या शेतकर्यांना सुखाचे दोन घास देण्याचे काम करणार्या दुग्ध व्यवसायाला ताकद दिली पाहिजे. पुढील काळात कमी खर्चात जादा दूध मिळण्यासाठी गार्इंची उत्पादकता वाढविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संकरित गार्इंचे मेहनतीने उत्कृष्ट संगोपण करणार्या महिलांचे त्यांनी कौतुक केले. तांबे, मांडगे, गील, देशमुख यांची समायोचीत भाषणे झाली. मंत्रीद्वयींच्या हस्ते उत्कृष्ट गोपालक व दूध संस्था संचालकांचा गौरव केला. प्रास्ताविक डॉ. पी. बी. पावसे यांनी केले. पशु व दूग्ध विकास औजार प्रदर्शनातील एच. एफ. गीर, जर्सी, संकरित, खिल्लारी, डांगी आदी जातीच्या गायींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (प्रतिनिधी)
‘मुक्त गाय गोठा’ प्रकल्पाला अनुदान
By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST