अरुण वाघमोडे । अहमदनगर : मी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती़. माझे ध्येय मात्र ठरले होते, निश्चय पक्का होता़. व्हायचे तर पोलीस अधिकारीच. अखेर माझ्या इच्छाशक्तीला कुटुंबीयांचेही पाठबळ मिळाले आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ‘शिक्षण ते नोकरी’ या प्रवासात प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागतो़. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रत्येक अडचणींवर मात करता येते. आई-वडिलांचा आशीर्वाद, चांगल्या माणसांचा सहवास आणि विविध विषयांवरील वाचन यातूनच सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन माझी जडणघडण झाली़, अशी भावना पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मिटके म्हणाले, वडील जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यामुळे घरात चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण होते. औरंगाबाद शहरात शालेय ते महाविद्यलयीन शिक्षण पूर्ण झाले. शालेय वयातच पोलीस अधिकारी आणि खाकी वर्दीचे आकर्षण मनात निर्माण झाले होते. हे आकर्षण कधीच कमी झाले नाही़. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला प्रारंभ केला. लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी जाहिराती प्रकाशित होत होत्या. अभ्यास आणि परीक्षा देणे असे सुरू होते. या प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालो आणि जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झालो़. दोन वर्षे नगर जिल्ह्यात नोकरी केली़. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे अभ्यास सुरूच ठेवला होता. अखेर पोलीस अधिकारी पदासाठी जाहिरात प्रकाशित होताच अर्ज भरला. अभ्यासात सातत्य होत. त्यामुळे प्रयत्नांना यश आले आणि अंगावर खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता ख-या अर्थाने माझ्या करिअरला प्रारंभ झाला आहे. आपले दैनंदिन जीवन आणि कामातील अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे असते. आपण कसे घडायचे हे मात्र आपल्या हातात असते. पोलीस दलात असल्याने आम्हाला गुन्हेगार शोधावे लागतात तर चांगली माणसे स्वत:हून संपर्कात येतात. हा चांगलेपणाचा संग्रहच आयुष्याच्या घडणीत महत्त्वाचा ठरत असतो.
ध्येय ठरले होते, निश्चय पक्का होता-संदीप मिटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:42 IST