अहमदनगर : रेल्वे स्टेशन येथील मालधक्का श्रीगोंदा, श्रीरामपूर व विळद घाट येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. मालधक्का स्थलांतरित करण्यासाठी हुंडेकरी, वाहतूक ठेकेदार आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांचे संगनमत झाले असून, यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा गंभीर आराेप करत संबंधित अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी हमाल माथाडी कामगारांनी केली आहे.
येथील रेल्वे स्टेशन मधील मालधक्क्यावर सुमारे ६०० हमाल माथाडी कामगार काम करत आहेत. वाहतूक ठेकेदार व हमाल माथाडी कामगारांमध्ये दरावरून वाद उफळला आहे. माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने दिलेला दरवाढीचा करार कामगारांनी मान्य केला आहे. मात्र हा आदेश हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी अमान्य करत माल आणणे बंद केले आहे. त्यामुळे सहाशे माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात माथाडी कामगारांनी जीवाची पर्वा न करता गहू, तांदूळ, रासायनिक खतांचा पुरवठा केला. असे असताना हुंडेकरी, वाहतूकदार आणि कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी संगनमत करत हमाल माथाडी कामगार संपावर आहे, अशी खोटी माहिती वरिष्ठांना दिली. परिणामी अहमदनगरच्या रेल्वे मालधक्क्यावर येणारे अन्नधान्य, खते, सिमेंट विळद, श्रीरामपूर, श्रीगोंदा या मालधक्क्यावर उतरविण्यास सुरुवात झाली आहे. याविरोधात हमाल माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. कामगारांसह विविध संघटनांनी कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे हमाल माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी किरवे यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा सर्व कामगार संघटना फेडरेशनच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. रमेश बाबू, नगरसेवक प्रशांत गायकवाड, कॉ. गणेश कंदूर, मधुकर पाटोळे, पोपट लोंढे, पंडित झेंडे, विलास उबाळे, दीपक रोकडे, सुरेश निरभवने, भैरवनाथ वाकळे, मेहबूब सय्यद, रामदास वागस्कर, संतोष निरभवणे आदी उपस्थित होते.
....
नगर रेल्वे स्थानक ते विळद अंतर २ किमी.
नगर येथील रेल्वे स्थानक ते विळद घाट हे अंतर १८ किमी. इतके आहे. असे असताना जिल्हा कृषी विकास अधिकारी किरवे यांनी हे अंतर २ किमी. आहे, अशी माहिती प्रशासनाला पत्राद्वारे दिली आहे. ही माहिती देण्यासाठी त्यांनी हुंडेकरी व मालवाहतूक यांच्याकडून मोठी रक्कम घेतली आहे, असा आरोप हमाल माथाडी कामगारांनी केला आहे.
................
- येथील मालधक्का बंद असल्यामुळे अन्नधान्य व खते इतर ठिकाणी उतरवून त्याचा तालुक्यांना पुरवठा करावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना खते उपलबध करून द्यावी, हा त्यामागील हेतू आहे.
- शंकर किरवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी
...
- मंडळाने केलेली दरवाढ हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांना मान्य नसतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. येथील मालधक्का बंद करून इतरत्र माल उतरवू नये. तसे झाल्यास हमाल माथाडी कामगार कुटुंबासह आंदोलन करण्यात येईल.
- अविनाश घुले, अध्यक्ष, हमाल पंचायत
सूचना : ०८ कामगार नावाने फोटो आहे.