राजूर : अकोले तालुक्याला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शिवकालीन मंदिरे आहेत. या मंदिरांची डागडुजी होणे आवश्यक असल्याने शिवकालीन मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आ. वैभव पिचड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अकोले तालुका हा आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून, पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यातील हरिश्चंद्रगड (महादेव मंदिर), रतनवाडी (अमृतेश्वर मंदिर), वारंघुशी (पांडवकालीन शिवमंदिर) व सोमठाणे (तिरडे) येथे प्राचीन शिव मंदिरे प्रसिद्ध आहेत. हजारो वर्षांपूर्वीची शिवकालीन मंदिरे आहेत. ही मंदिरे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त व पर्यटक येतात. सदर मंदिरे अत्यंत जीर्ण झालेले असून, मंदिरांची डागडुजी व दुरुस्ती करण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली नाही. ही बाब तालुक्यावर अन्याय करणारी आहे.
राज्यातील इतर शिवकालीन मंदिरांसाठी सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने निधी देण्याचे ठरविले आहे. मात्र, अकोले तालुक्यातील प्राचीन शिवकालीन मंदिर सुशोभीकरण करण्याचा विचार केलेला नाही. ही बाब तालुक्यावर अन्याय करणारी आहे. एका बाजूला पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याच्या पोकळ घोषणा केल्या जातात. मात्र, दुसऱ्या बाजूला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या पुराण काळातील मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही ही बाब खेदाची आहे. त्यामुळे तालुक्यातील शिवकालीन मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पिचड यांनी पत्राद्वारे केली आहे.