श्रीगोंदा : डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावांच्या विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली भावना आहे.
बिनविरोध निवडणुका करणाऱ्या गावांना प्रत्येकी दहा लाखांचा विकासनिधी देणार आहे, अशी माहिती आ. बबनराव पाचपुते यांनी दिली.
यासंदर्भात पाचपुते यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. गेल्या ९ महिन्यांपासून सर्वांवर कोरोनाचे संकट आहे. याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. शिवाय, निवडणूक म्हटले की, गावात गट-तट निर्माण होतात. या राजकारणाचा गावाच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होतो. वादविवाद टळावेत. गावाच्या विकासासाठी व आर्थिक संकटात शासनाचे पैसे वाचावेत. गावांना विकासाची दिशा मिळावी यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने उभे राहून निवडणुका बिनविरोध कराव्यात. बिनविरोध निवडणुका म्हणजे, आदर्श गाव निर्माण करण्याची ही पायाभरणी ठरू शकते. पूर्ण गावाची एकी झाल्यास त्या गावाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असे पाचपुते म्हणाले.
श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील जी गावे निवडणुका बिनविरोध करतील, त्या गावांना प्रत्येकी दहा लाखांचा निधी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पासपोर्ट फोटो : बबनराव पाचपुते