खर्डा : कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्काचा भार श्री संत गजानन महाविद्यालय उचलणार असून, त्यांना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजय गोलेकर यांनी दिली.
यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते. खर्डा येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पवार यांनीही या उप्रकमाचे स्वागत केले. महेश गोलेकर म्हणाले, समाज म्हणून आपण त्यांचे आई-वडील होऊ शकत नसलो तरी आई-वडिलांची भूमिका पार पाडू शकतो. या दृष्टिकोनातून महाविद्यालय आपला खारीचा वाटा उचलत आहे. जामखेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक शुल्काचा भार संस्थेने उचलल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासंबंधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव व प्रा. धनंजय जवळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.