तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी शहरातील जीपीऔ चौक परिसरात छापा टाकून १ हजार ९३७ लिटर काळे डिझेल जप्त केले होते. हे बनावट डिझेल असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी प्रथम जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ तसेच भादवी कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात मात्र हे लाईट डिझेल ऑईल असल्याचे स्पष्ट झाले. हे ऑईल औद्योगिक कारणासाठी वापरले जाते. त्याचा दर डिझेलच्या तुलनेत लिटरमागे पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त आहे. दरातील तफावतीमुळे हे ऑईल तस्कर काळ्या बाजारातून खरेदी करून आपल्या यंत्रणेमार्फत विक्री करतात. वाहनांसाठी हे ऑईल वापरण्यास परवानगी नाही तरीही त्याची डिझेल म्हणून विक्री करून शासनासह वाहनचालकांची फसवणूक केली जात आहे. हा गुन्हाही तितक्याच गंभीर स्वरुपाचा असल्याचे तपासी अधिकारी मिटके यांनी यात वाढीव कलमे लावून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.
चौघांना अटक करून चौकशी
या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत गौतम बेळगे (भिंगार), जामखेड येथील टँकर चालक व या तस्करीचा मुख्य सूत्रधार राहुरी येथील शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर अशा चौघांना अटक करून चाैकशी केली आहे. या चौकशीत हे ऑईल मुंबई व गुजरात येथून आणले जात असल्याचेही समोर आले आहे.