पळवे / सुपा (जि. अहमदनगर) : नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव फाटा शिवारातील (ता. पारनेर) संजीवनी हॉटेलजवळ ट्रक, दुचाकी, कंटेनर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांसह ट्रक चालक, क्लिनर अशा चौघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
राजाभाऊ विष्णू चव्हाण, पुरूषोत्तम राजाभाऊ चव्हाण (दोघेही रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) हे पितापुत्र आणि ट्रक चालक शुभम राजू देशभ्रतार (रा. चमेली, दुधाडा, ता. कटोल, जि. नागपूर), क्लिनर राहुल मधुकर डोंगरे (चावली, ता. कारंज, जि. वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.
सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास जातेगाव शिवारात पुण्याहून नगरकडे एक कंटेनर चालला होता. त्या कंटनेर मागे बीड जिल्ह्यातील दोघे एका दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकी मागे एक पाईप वाहणारी ट्रक होती. त्याचवेळी संजीवनी हॉटेलजवळ कंटेनरच्या चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यानंतर ट्रक चालकानेही ब्रेक दाबला. मात्र ट्रकने दुचाकीला पाठीमागून उडविले. त्यात दुचाकीवरील दोघांचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. ट्रकमधील पाईप ट्रकची बॉडी तोडून केबिनमध्ये घुसल्याने चालकासह क्लिनरचा ही मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की वाहनांमध्ये व वाहनाखाली अडकलेले मृतदेह क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आले.
----
२० जातेगाव ॲक्सिडेंट
जातेगाव फाटा (ता. पारनेर) शिवारात झालेल्या अपघातात ट्रक, दुचाकीची अशी अवस्था झाली होती.