चिचोंडी पाटील : निवडणूक कालावधीत झालेल्या परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपांतून निवडणूक रणसंग्रामात निर्माण झालेली दरी संपविण्यासाठी ॲड. लक्ष्मण हजारे व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून मतदान संपल्यानंतर लगेचच निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांना एकत्र आणून मनोमिलन करण्यात आले.
परस्परविरोधी उमेदवारांना एकमेकांना श्रीफळ देऊन, झाले गेले विसरून पुन्हा एकदिलाने राहण्यासाठी गळाभेट घडवून आणण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणारे सर्व ३२ उमेदवार व बिनविरोध निवड झालेला एक उमेदवार यांच्यासह माजी मुख्याध्यापक एस. एस. कोकाटे, उद्योजक फकिरा पवार, भाजपचे नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, शिवसेना नेते प्रवीण कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय सदाफुले, बबनराव शेळके, कल्याण ठोंबरे, माजी उपसरपंच मारुती ससे, माजी सरपंच अर्चना चौधरी, दीपक चौधरी, शारदा ठोंबरे, पांडुरंग ससे, संतोष कोकाटे, दिलीप पवार, लीला हजारे, आदी उपस्थित होते.
निवडणुका म्हटले की एक-दुसऱ्याच्या समोरासमोर परस्परविरोधात प्रचार करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे कधी भावकी-भावकीत, भावा-भावांत किंवा मित्र-मित्र आपापला प्रचार करून विजयासाठी प्रयत्न करताना परस्परविरोधी वक्तव्ये करतात. त्यातून अनवधानाने किंवा ओघाने मने दुखावली जातात. ही बाब कायमस्वरूपी कटुता निर्माण करते. असे प्रकार घडू नयेत व गावात शांतता राहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. माजी प्राचार्य एस. एस. कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.
फोटो ओळी १६ चिचोंडी पाटील
चिचोंडी पाटील येथील पावन गणपती मंदिरात ग्रामपंचायतीची निवडणूक संपताच सर्वपक्षीय उमेदवारांचा मनोमिलन कार्यक्रम पार पडला.
(छायाचित्र : संजय ठोंबरे)