अहमदनगर : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत नगरमध्ये फूट पडली आहे. महापौर निवडणुकीत सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला सुरुवातीपासूनच विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज घेत बिनविरोधचा मार्ग राेखून धरला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या घोषणेनंतरचही नगरच्या महापौरपदाची ही पहिलीच निवडणूक आहे. महापौरपदासाठी बुधवारी ऑनलाइन मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारी प्रारंभ झाला. सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विनीत पाऊलबुद्धे आदी सेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसने महापौर या पदावर दावा ठोकला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शहरातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सेना- राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार सेना- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी पत्नी शीला चव्हाण यांच्या नावाने अर्ज नेले आहेत.
.................................
वरिष्ठ नेत्यांचा संपर्क नाही
राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. नगर महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. काँग्रेसचे मनपातील संख्याबळ कमी असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काँग्रेसला विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु, काँग्रेसला विश्वासात घेतले गेले नाही. याबाबत वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही. हे विशेष.