कळस : अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र कळस येथे सुभाषपुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व त्रिदिनात्मक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात भजनी मंडळ, महिला, तरुण, ग्रामस्थ भाविक सहभागी झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून मुर्तीवर अनेक प्रकारचे धार्मिक विधी पार पडले. बुधवारी सकाळपासून पूजा पार पडली. महाराजांच्या मुर्तीला पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. जिल्हा परिषदेचे सभापती कैलास वाकचौरे यांनी मुर्तीला सपत्निक अभिषेक घातला. त्यानंतर मूर्ती समाधी स्थानावर स्थापन करण्यात आली. यावेळी संपूर्ण मंदिरावर व समाधीस्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. नेवासा येथील उध्दव महाराज मंडलिक यांचे कीर्तन झाले. सुमारे २० ते २५ हजार भाविकांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. माजी मंत्री मधुकर पिचड, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, आमदार वैभव पिचड, माजी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड आदींनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामुळे कळसचे वातावरण भक्तीमय बनले होते.हेलिकॉप्टरद्वारे झालेली पुष्पवृष्टी हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. सभापती कैलास वाकचौरे यांचे सुपुत्र सुमित वाकचौरे, शंभू नेहे यांनी तीन फे-यांमध्ये पूर्ण मंदिरावर पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टर आल्यानंतर कळसमध्ये ओम नमो:शिवायचा मोठ्याने जप सुरू होता.
कळस येथे सुभाषपुरी महाराजांच्या समाधीस्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:08 IST