पारनेर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या आदिवासी व दुर्गम भागात शुक्रवारी सायंकाळी वादळाचा जोरदार तडाखा बसला. यावेळी लमाणतांड्यावरील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले तर अनेकांच्या घरातील धान्य भिजले व काही जणांच्या घरांचे नुकसान झाले.वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा परिषदेच्या लमाणतांड्यावरील शाळेचे पत्रे उडून लांबवर जाऊन पडले. भिंती पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात झाडे, विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. लमाणतांडा भागात मच्छिंद्र अश्रू सांगळे यांच्या घरावरील पत्रे उडून घरातील गहू, बाजरीचे सुमारे बारा ते पंधरा पोते भिजून नुकसान झाले. कुंडलिक पवार, बर्डे यांच्याही घरावरील पत्रे उडाली. हेमलाचा तांडा परिसरात अशोक पवार, संदीप राठोड, दशरथ राठोड, छबन जाधव यांच्या घराचे पत्रे उडाले तर बबन जाधव यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. वादळी पावसाच्या तडाख्याने नुकसान होताच अजय जाधव, विकास जाधव यांच्यासह परिसरातील तरुणांनी तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान, येथील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र तेथील मंदिरातच जागून काढावी लागली. (तालुका प्रतिनिधी)
ढवळपुरीत वादळामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 23:26 IST