श्रीगोंदा : पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारताना कौठा येथील भीमा नदी पात्रात जिलेटिनचे स्फोट घडवून छापा टाकत पकडलेल्या ४ सेक्शन बोटी व १ फायबर बोट अशा एकूण १६लाख रूपये किमतीच्या पाच बोटी स्फोट घडवून नष्ट केल्या.याप्रकरणी तीन वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सोमनाथ कर्णवर,काँस्टेबल प्रकाश वाघ, दादासाहेब टाके, किरण बोºहाडे, प्रताप देवकाते, उत्तम राऊत, चालक किसन शिंदे या पोलीस पथकाने हा छापा टाकला.पोलिसांना कौठा शिवारातील भीमा नदी पात्रात बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी पकडल्या. अंधाराचा फायदा घेत बोटीवरील लोक पाण्यात उड्या टाकून पळून गेले. या बोटी रात्रीच्या अंधारात फोडता येणे शक्य नसल्यामुळे त्या मंगळवारी तलाठ्यांच्या व पंचांच्या समक्ष फोडण्यात आल्या.बोटीचे चालक मालक योगेश परकाळे, प्रताप शिपलकर, विनायक मगर यांच्या विरोधात पोलीस काँस्टेबल प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या बोटी या एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे बोटींवर कारवाई न करण्याबात पोलिसांवर दबाव आणला जात होता. त्या दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आली.
स्फोटाने वाळू तस्करांच्या पाच बोटी उडविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:17 IST