अहमदनगर : जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लसीकरणाला प्रारंभ झाला. शनिवारी दुपारी चार पर्यंत ६४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे ज्योती लवांडे या अंगणवाडी सेविकेस पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या लसीकरण मोहिमेचे स्वागत केले. ‘कोरोनाला हरवायचं आहे’ या आत्मविश्वासाने कार्यरत फ्रन्टलाईन वर्कर्सना या लसीचा डोस मिळाल्याने त्यांचेही मनोबल उंचावले. लसीकरणानंतर कोणत्याही आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना त्रास जाणवला नाही. मोहिमेच्या सुरुवातीनंतर जिल्ह्यात इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण २१ केंद्रांपैकी शनिवारी १२ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
------------
महापालिकेच्या केंद्रावर प्रारंभ
अहमदनगर महापालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महानगरपालिकेचे पदाधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार होते, त्यांची ओळख पटवून पोर्टलवरील त्यांच्या नावाची खात्री झाल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात येत होते. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि आमदार जगताप यांनी पुष्पगु्च्छ देऊन त्यांचे कौतुक केले. लसीकरणानंतर काही त्रास होत नाही ना, अशी विचारणाही केली. त्यावर त्यांनी त्रास होत नसल्याचे सांगितले.
जागृती करणारी रांगोळी
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सर्व केंद्रांनी प्राथमिक तयारी पूर्ण केली होती. आरोग्य विषयक जनजागृती करणारी रांगोळी आरोग्य केंद्राच्या बाहेर रेखाटण्यात आली होती. लसीकरण देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून त्यांना ओळख पटवून तसेच त्यांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतर लसीकरणाला नेले जात होते. लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात होता. सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्या २ तासांत साधारण प्रत्येक केंद्रांवर १२-१४ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. जिल्ह्यातील इतर १० केंद्रांवर लसीकरण झाले.
-------
फोटो आहेत.