केडगाव : अवतार मेहेरबाबांच्या अमरतिथी सोहळ्यास भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारी मेहेर टेकडी यंदा भाविकांअभावी सुनी सुनी वाटत आहे. यावर्षी कोरोनामुळे भाविकांनी घरीच राहून हा सोहळा ऑनलाईन साजरा केला.
१९७० पासून मेहेराबाद (ता. नगर) येथील मेहेर टेकडीवर अवतार मेहेरबाबांचा अमरतिथी सोहळा साजरा केला जातो. ३१ जानेवारी १९६९ ला अवतार मेहेरबाबांचे महानिर्वाण झाले. यामुळे हा दिवस अमरतिथी म्हणून साजरा केला जातो. या निमित्त दरवर्षी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातून ८० देशातील भाविक सोहळ्यात सहभागी होतात. देशातील विविध भागातील हजारो भाविक मेहेरबाबांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.
यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरतिथी उत्सव साजरा करण्यात येणार नाही, असे याआधीच ट्रस्टने जाहीर केले होते. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या तीन दिवसांत होणारे कार्यक्रम हे सर्व रेकॉर्डिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भाविकांनी घरीच राहून साजरे करण्याचे ठरले आहे.
ट्रस्टने कुठल्याही प्रकारच्या निवास, खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली नव्हती. भाविकांनाही दर्शनाला न येण्याची विनंतीही केली होती. तरीही काही मेहेरप्रेमींनी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी हजेरी लावलीच. येणाऱ्या भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले नव्हते. दर्शनासाठी आलेेल्या भाविकांना सुरक्षित अंतरावर ठेवून सॅनिटाईझ करूनच दर्शनासाठी सोडण्यात येत होते.
ज्या मैदानावर तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या मैदानावर शुकशुकाट होता. रविवारी दुपारी १२ ते १२.१५ पर्यंत अवतार मेहेरबाबा यांच्या मौन कालावधीत प्रत्येक मेहेरप्रेमींनी आपल्या निवासस्थानातून मौन पाळले. तसेच टेकडीवर आलेल्या भाविकांनी तेथील झाडाखाली बसून मौन पाळले. तीन दिवस चालणारे भजन, आरती, गायन, वादन, नृत्य आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले.
---
१९७० पासून मेहेराबादला अमरतिथी सोहळा साजरा केला जातो. यावर्षी कोरोनामुळे त्यात प्रथमच खंड पडला. आम्ही ट्रस्टच्यावतीने कोणीही येथे दर्शनासाठी न येण्याचा व घरीच राहून ऑनलाईन सोहळ्याचा आनंद घेण्याचा, मौन पाळण्याचा संदेश दिला होता. आम्ही कोणतेही स्टॉल येथे उभारले नाहीत. तरीही काही भाविक दर्शनासाठी आले होते.
-रमेश जंगले,
विश्वस्त, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट
फोटो दोन : ३१ मेहेरबाबा, १
मेहेराबाद येथील सुनी सुनी मेहेर टेकडी. दुसऱ्या छायाचित्रात आलेल्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. (छायाचित्र : नागेश सोनवणे )