मिरजगाव : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कर्जत तालुक्यातील पहिली जनावरांची छावणी कोंभळी, ता. कर्जत येथे आज सुरू करण्यात आली.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यामध्ये दोन छावण्या मंजूर झाल्या असून, यातील पहिल्या छावणीचा शुभारंभ कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, अॅड. शिवाजी अनभुले, पं. स. सदस्य पंढरीनाथ गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर, तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, भाजपा शहराध्यक्ष कैलास बोराडे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी नगराध्यक्ष राऊत म्हणाले, तालुक्यात व जिल्ह्यात तीव्र दुष्काळस्थिती असून, पालकमंत्र्यांनी या भागाची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगितल्यामुळे या छावण्यांना मान्यता मिळाली असून, टप्प्याटप्प्याने चार-पाच गावे मिळून पाहणीनंतर प्रशासन छावण्याबाबत निर्णय घेईल, असे ते म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष खेडकर, अॅड. अनभुले यांची भाषणे झाली. कोंभळी-खांडवी मजूर संस्थेलाही छावणी मिळाली असल्याचे छावणीचालक भाऊसाहेब तापकीर व संजय तापकीर यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांना चारा, खुराक दिला जाईल. यावेळी भाऊसाहेब काकडे, विनायक गांगर्डे, उत्तम गांगर्डे, किशोर तापकीर, आबा गोरखे आदी मान्यवर व छावणीमधील शेतकरी उपस्थित होते. या छावणीमध्ये आनंदवाडी, मुळेवाडी, कोंभळी, खांडवी, कौंडाणे चिंचोली, थेरगाव, खळगाव या भागातील मोठ्या प्रमाणात जनावरे आली असून, या छावणीमध्ये तीन हजार जनावरे दाखल होतील, असा अंदाज आहे. या छावणीमुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(वार्ताहर)
जिल्ह्यातील पहिली छावणी कोंभळीत
By admin | Updated: April 19, 2016 00:35 IST