अहमदनगर : कोरोनाच्या संकटकाळात विविध जबाबदारी स्वीकारुन शिक्षकांची तन, मन व धनाने सेवा सुरु आहे. १ व २ जून रोजी असलेल्या शासकीय वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या वाढदिवसानिमित्त तब्बल दीड लाखांची मदत जमा करुन रुग्णसेवा देणाऱ्या कोविड सेंटरला देण्यात आली. आप्पासाहेब शिंदे मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या संकटकाळात आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा हा दिवस सत्कारणी लागण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल दीड लाख रुपये जमा केले. माउली सेवा प्रतिष्ठान संचलित देहरे (ता. नगर) येथील मनगाव प्रकल्पात सुरु असलेल्या मनोरुग्णांच्या कोविड सेंटरला ५१ हजार रुपये, भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरला ५० हजार रुपये तर जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला ५० हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले. मनगाव प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, निलम लोखंडे व मोनिका साळवे यांनी या मदतीचा स्वीकार केला. यावेळी आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, नंदकुमार शितोळे, शिवाजी नरसाळे, उद्धव सोनवणे, रामलाल कर्डिले, रावसाहेब चौधरी, राजेंद्र लोहकरे, बाबासाहेब पवार, देविदास पालवे, अशोक कांडके, विकास थोरात, राहुल कांडके, चंद्रकांत कांदळकर, सुनील विधाटे, गणेश हारेर आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले की, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. या कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील उत्तमपणे योगदान दिले. अनेक शिक्षक कोरोना महामारीत गमावले गेले. या संकटकाळात शिक्षकांनी दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
--------
फोटो मेल
०१शिक्षक मदत
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने देहरे येथील मनगाव कोरोना सेंटरला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.