रोहित टेके/कोपरगाव : तालुक्यातील एका महिलेचे दिल्लीहून पोस्ट कार्यालयामार्फत पाठविलेले औषधाचे पार्सल लॉकडाऊनमुळे कोठे अडकले हे समजत नव्हते. या महिलेने थेट दिल्लीपर्यंत सूत्र हलविले. त्याची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेतल्याने अखेर गुरुवारी (दि.२ एप्रिल ) रोजी नाशिक येथे अडकलेली औषधे पोस्ट विभागामार्फत स्वतंत्र गाडीने थेट सदर महिलेपर्यंत पोहोच करण्यात आले. संवत्सर येथील महानुभाव आश्रमातील तपस्विनी प्रेरणा महानुभव असे या महिलेचे नाव आहे. कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे डाक निरीक्षक विनायक शिंदे, मेल ओव्हर्सिअर अर्जुन मोरे, संवत्सर पोस्टाचे पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड, जीवन पावडी यांनी ते तपस्विनी प्रेरणा महानुभाव यांच्याकडे औषधांचे पार्सल सुपूर्द केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर महानुभाव आश्रमात प्रेरणा महानुभाव पंथाचे सेवा करीत आहेत. त्या मूळच्या दिल्लीच्या आहेत. दोन तीन वर्षांपासून त्या आश्रतात आहेत. दिल्ली येथून त्यांच्या नातेवाईकांनी (१७ मार्च ) रोजी औषधांचे पार्सल पोस्टाद्वारे पाठवले होते. लॉकडाऊनमुळे कोठे अडकलेले म्हणून त्यांनी व्ट्टिर व दिल्ली, मुंबई व आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी देखील संपर्क साधला. तहसीलदार योगेश चंद्रे यांना देखील संपर्क साधला होता. सर्व बाजूने सूत्रे हलविली गेल्याने अखेर गुरुवारी सायंकाळी संवत्सर आश्रमात औषधांचे पार्सल पोहोच झाली. यावेळी तपस्विनी प्रेरणा महानुभाव, आश्रमाचे संचालक राजधर बाबा यांनी त्यांचे आभार मानले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे.
...अखेर ‘त्या’ महिलेच्या औषधांचे पार्सल पोहोच; केंद्रींय आरोग्यमंत्र्याने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:44 IST