केडगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले स्व. दादा पाटील शेळके नगर बाजार समितीचे प्रवेशद्वार जिल्हाधिकारी यांचा लेखी आदेश मिळताच गुरुवारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उघडण्यात आले. गेले दोन महिने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला.
विरोधकांनी यासाठी फक्त स्टंटबाजी केली, असा आरोप जगताप यांनी यावेळी केला.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने तीन वर्षांपूर्वी नगर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समितीचे एक मुख्य प्रवेशद्वार बंद केले. यामुळे बाजार समितीत जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू झाली. दोन महिन्यापूर्वी शिवसेनेने बंद असलेले प्रवेशद्वार उघडून आंदोलन केले.
यानंतर लगेचच वाहतूक शाखेने कारवाई करीत प्रवेशद्वार पुन्हा बंद केले. जिल्हा सुरक्षा समितीने नंतर हे प्रवेशद्वार उघडले जावे असे पत्र दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना हे प्रवेशद्वार उघडण्याबाबत निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रवेशद्वार उघडण्यास परवानगी दिल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हे प्रवेशद्वार उघडण्यात आले. यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, बहिरू कोतकर, राजेंद्र बोथरा, उद्धव कांबळे, सभापती अविनाश घुले, संजय चोपडा, सचिव अभय भिसे, संजय काळे, व्यापारी उपस्थित होते.
---
प्रवेशद्वार उघडायचा आदेश आला तरी ते उघडले नाही, असे भासवत राजकारण केले गेले. स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी काही लोक बाजार समितीचा वापर करीत आहेत. स्टंटबाजी करण्यासाठी काही लोकांनी गेट उघडले. मात्र रस्ता सुरक्षा समितीने ते पुन्हा बंद केले होते. आता जिल्हाधिकारी यांनी कायस्वरूपीचे गेट उघडण्यास परवानगी दिली. हा प्रश्न कायमचा मार्गी लागला.
- संग्राम जगताप,
आमदार
----
तीन वर्षांपासून बाजार समितीचे मुख्य गेट एकतर्फा बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. व्यापारी वर्गाची अडचण झाली होती. हे गेट उघडण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले, व बाजार समितीने प्रयत्न केले. कोरोना, ग्रामपंचायत निवडणुका यांमुळे वेळ लागला. चार दिवसांपूर्वी गेट उघडे करण्याचा निर्णय झाला होता. मात्र लेखी आदेश बाजार समितीला मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी गेट उघडले गेले.
- अभिलाष घिगे,
सभापती, बाजार समिती
--
११ नगर बाजार समिती
नगर बाजार समितीच्या गेटचे टाळे गुरुवारी उघडण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप व इतर उपस्थित होते.