राक्षी येथील घटना : ८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हाशेवगाव : पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाला तू आमच्या गावासाठी पाणी शिल्लक का ठेवले नाही? असे म्हणून ७ ते ८ लोकांनी हॉकीस्टीक व लोखंडी पाईप, फावड्याच्या दांड्याने मारहाण केल्याची तसेच त्यापैकी एकाने रिव्हॉल्वरचा धाक दाखविल्याची तक्रार सोमनाथ रंगनाथ वारे यांनी शेवगाव पोलिसात दाखल केली. याबाबत पोलिसांनी या लोकांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. राक्षी येथे गुरुवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सोमनाथ वारे हे पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावास राक्षी उद्भवावरून टँकरद्वारे पाणी पुरवठा करतात. ते १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास मालेवाडी येथून राक्षी येथे परत जात असताना खरवंडी गावातील समीर घोडके, शाम घोडके, हनुमान गोल्हार व तिघांनी त्यांचा टँकर अडविला व तू आमच्या गावासाठी पाणी शिल्लक का ठेवले नाही? याविषयावरून त्याच्याशी हुज्जत घातली असता चालक वारे यांनी ‘तुमचे खरवंडी गाव पाणी पुरवठ्यासाठी माझ्याकडे नाही. त्यामुळे तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी माझी नाही.’ असे सांगितल्याचा राग धरून त्यांनी आपल्याशी शाब्दीक वाद घातला व दमदाटी केली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास आपण टँकर भरण्यासाठी राक्षी उद्भवावर उभे असताना शुक्रवारी रात्री झालेल्या वादाच्या कारणावरून मनात राग धरून ८ ते ९ जणांनी एकत्र येऊन मला काठीने, लोखंडी पाईपने, हॉकीस्टीक व फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. त्यात पाठीवर व पायांवर मार लागल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनास्थळी उपस्थित आदिनाथ दौंड, बप्पा बांगर, लक्ष्मण खेडकर, शिवाजी खेडकर व इतर सहकारी टँकर चालक यांनी आपल्याला शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चालक सोमनाथ वारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समीर घोडके, शाम घोडके, रा.खरवंडी कासार, ता.पाथर्डी, हनुमान गोल्हार, रा.जवळवाडी, ता.पाथर्डी व इतर ५ ते ६ अनोळखी इसमांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून, याबाबत हे.कॉ.तुळशीराम गिते हे अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)टँकर चालकांचे काम बंद आंदोलनपाणी पुरवठा करणाऱ्या आपल्या सहकारी टँकर ड्रायव्हरला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांच्या इतर सहकारी टँकर ड्रायव्हरनी शनिवारी काम बंद आंदोलन पुकारून सदर घटनेची तक्रार दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी नोंदविली. शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर हेही पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, दुपारनंतर पाण्याचे टँकर भरण्याची सुविधा पूर्ववत सुरू झाली. या घटनेतील आरोपींना अटक करण्याची तसेच याबाबत दिरंगाई दिसून आल्यास पुन्हा केव्हाही काम बंद आंदोलन पुकारण्याचा निर्धार त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून टँकर चालकाला बेदम मारहाण
By admin | Updated: April 16, 2016 23:14 IST