श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. जिल्ह्यातील ७६ मुलांवर अशी दुर्दैवी वेळ ओढावल्याची माहिती जिल्हा बालकल्याण विभागाकडून मिळाली.
राज्य व केंद्र सरकारने कोरोना संकटात अनाथ बनलेल्या मुलांसाठी विशेष योजना चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत मुलांचा सांभाळ करण्यापासून त्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा समावेश आहे. अनाथांना सज्ञान होईपर्यंत ठोस स्वरूपात मासिक आर्थिक मदतीचीही तरतूद करण्याची घोषणा सरकारने केली आहे. प्रत्यक्षात मात्र या योजना व संकल्प कितपत सत्यात उतरतो, हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबच बाधित झाल्याच्या अनेक घटना घडल्या. या तडाख्यातून लहान मुले बचावली गेली. मात्र, आई व वडील मृत्यू पावले. राज्य सरकारच्या यंत्रणेकडून आता अनाथ झालेल्या अशा मुलांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. अनाथांची आकडेवारी संकलित करून, तसेच त्यांची पडताळणी करून ही माहिती सरकारजमा केली जाणार आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या मदतीने अंगणवाडीसेविका, तसेच मदतनिसांकडून जिल्ह्यातील अनाथ मुलांची माहिती संकलित केली जात आहे.
-------
७६ मुलांचे छत्र हरपले
नगर जिल्ह्यामध्ये आजअखेर ७६ मुलांचे कोरोनामुळे आई, वडील दोघांचेही छत्र हरपले आहे, तर सहा पाल्यांनी आई अथवा वडील यापैकी एकाला गमावले आहे.
------
बाल संगोपन योजना
अनाथ बनलेल्या मुलांकरिता सरकारच्या वतीने बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत अनाथ मुलगा अथवा मुलगी यांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत प्रति महिना अकराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर, त्यांचे बालगृहामध्ये संगोपन केले जाते.
----
सामाजिक तपासणी अहवाल
बाल कल्याण समितीच्या वतीने अनाथ मुलांचा सामाजिक तपासणीचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालामध्ये मुलांच्या कौटुंबिक, तसेच आर्थिक माहितीचा समावेश असेल. मुलांचा सांभाळ करण्यासाठी जवळच्या नातेवाईक मंडळींची तयारी आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
-----
अनाथ मुलांच्या फसवणुकीची शक्यता
अनाथ मुलांच्या नावावर काही संपत्ती असल्यास जवळच्या नातेवाइकांकडून त्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुलांच्या संपत्तीला संरक्षण पुरविण्यासाठी बाल कल्याण समितीच्या वतीने जिल्हा विधिसेवा प्राधिकरणची मदत घेतली जाणार आहे.
----
कोरोनामुळे अनाथ बनलेल्या मुलांविषयी कोणालाही काही माहिती असल्यास आम्हाला संपर्क करावा. या मुलांकरिता सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
- वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.
-----
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण : २,६५,४७१
उपचाराधीन रुग्ण : ८५२०
एकूण मृत्यू : ३,३५६
----