आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाचे दिवस असल्याने सोसाट्याचा वारा वाहत होता. यावेळी सुमतीलाल गांधी यांच्या आश्वी - प्रतापपूर रस्त्यालगत असलेल्या शेतातील १०० वर्षे जुने लिबांचे झाड अचानक वीज वाहक तारेवर कोसळले. याच झाडाच्या सावलीखाली भाजी विक्री करण्यासाठी बसलेले ज्ञानदेव ताजणे हे लांब पळाल्याने थोडक्यात बचावले. झाड पडल्यामुळे वीज वाहक तारांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, झाड कोसळल्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले असून आश्वी बुद्रुक येथे खंडित झालेला वीज पुरवठा सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पूर्ववत झाला. यावेळी महावितरणचे सहायक अभियंता योगेश सोनवणे, महेश शिंदे, महेश कहाळे, बाबासाहेब डेंगळे, गुलाब डोंगरे, संदीप जाधव हे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत युध्दपातळीवर कामाला सुरुवात करून वीज पुरवठा सुरळीत केला.