लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी (जगताप), नागवडे (श्रीगोंदा) व साजन शुगर (देवदैठण) या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन ३ महिने होत आले तरी अजून चालू हंगामाचे उसाचे पेमेंट देण्यात आले नव्हते. हे पेमेंट मिळावे, यासाठी टिळक भोस यांनी साखर प्रादेशिक सहसंचालकांच्या दालनात ठिय्या आंदोनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी या कारखान्यांना आदेश काढत उसाचे पेमेंट त्वरित द्यावेत, असे आदेश दिले आहेत.
भोस यांनी २२ डिसेंबर रोजी साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा केली होती. तसे निवेदनही त्यांनी दिले होते. कुकडी (जगताप) साखर काखान्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीदेखील आजपर्यंत (कुकडी) जगताप कारखान्याने ५०० रुपये प्रति टनाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट दिलेले नाही. तसेच चालू गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास अडीच महिने होतील तरी तिन्ही कारखान्यांनी उसाची रक्कम दिलेली नाही. नागवडे (४२ कोटी ३२ लाख), जगताप (कुकडी) ३६ कोटी ४२ लाख, साजन शुगर (९ कोटी ११ लाख) या कारखान्यांकडे एवढी रक्कम बाकी आहे, असे भोस यांच्या निवेदनात म्हटले होते. तसेच हे पेमेंट त्वरित अदा व्हावेत, यासाठी भोस यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत तिन्ही कारखान्यांनी त्वरित पेमेंट करावेत, असे आदेश सहसंचालकांनी दिले आहे, अशी माहिती भोस यांनी दिली.
.............
आठवडाभरात पेमेंट करणार
नागवडे कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंत तोडलेल्या उसाचे पेमेंट आठवड्यात जमा करू, असे सहसंचालक कार्यालयाला कळविले आहे. तसेच कुकडी व साजन शुगर या कारखान्यांनीही एक आठवड्यात उसाचे पेमेंट अदा करण्याबाबत सहसंचालक साखर यास कळवले असल्याने भोस यांनी आंदोलन स्थगित केले.