राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे. बुऱ्हाणनगर येथून सरपंचपदाची सुरूवात केलेल्या कर्डिले यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली़ नगर-नेवासे मतदारसंघातून तीनदा, तर राहुरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय संपादन करून राजकीय आखाड्यात डावपेच टाकण्यात ‘हम भी कुछ कम नही’ याची प्रचिती आणून दिली़लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघाची नाडी ओळखली़ या मतदारसंघात पाथर्डी व नगरच्या गावांचा समावेश झाला तेव्हा बुऱ्हाणनगरचा हा पहिलवान अडसर ठरेल असे कुणालाही वाटले नाही़ गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी तालुक्यातून दहा हजार मताधिक्य घेणाऱ्या कर्डिले यांनी ४७ टक्के मते मिळवून मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे़आमदार म्हणून कर्डिले यांनी गेल्या पाच वर्षांत राहुरी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा लावला होता. मात्र विरोधी पक्षात असल्याने त्यांना भरीव काम करता आले नाही़ आता पुन्हा राहुरीत कमळ फुलले असून राज्यात भाजपा सत्तेवर येत असताना मतदार संघातील नागरिकांना अच्छे दिनची प्रतीक्षा आहे़ येत्या पाच वर्षांत विविध प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान कर्डिले यांच्यासमोर आहे. आमदारकीच्या कालावधीत शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक आरोप झाले़ विधानसभा निवडणुकीतही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले़ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आमदार कर्डिले यांनी प्रवरेच्या आशीवार्दाने व विरोधकांच्या मर्मावर बोट ठेवून विजयश्री खेचून आणली़ येत्या पाच वर्षात डोंगराएवढी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागणार आहे. मुळा धरणाची उंची वाढविण्यापेक्षा कालवे व चाऱ्यांचे काँक्रिटीकरण केले तर दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल़ राहुरी ते शनिशिंगणापूर या रस्त्याचे चौपदरीकरण केले तर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल़ मिनी एम़आय़डी़सी़, एस़टी़ डेपो, पाण्याचे नियोजन, रेल्वे उड्डाणपूल आदी महत्वाचे प्रश्न त्यांच्यासमोर असतील.मुळा धरणाच्या कृपेने राहुरीत उसाचे क्षेत्र मोठे आहे़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार व उस उत्पादकांचे प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कर्डिलेंनी दिली होती़ सत्ताधारी पक्षात नव्हतो म्हणून भरीव काम करता आले नाही असे कर्डिले यांनी वेळोवेळी मान्य केले होते़ आता सत्ताधारी असल्याने पाच वर्षांत जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा मतदारांना त्यांच्याकडून आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्डिलेंकडून अच्छे दिनची अपेक्षा
By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST