सुपा : पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या प्रशासकीय मंडळाचा विस्तार करण्यात आला असून पूर्वी त्रिसदस्यीय असणारे प्रशासकीय मंडळ आता ५ सदस्यीय झाले आहे. संभाजी रोहोकले अध्यक्ष, सुरेश थोरात यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली असून या मंडळात उत्तम गवळी, वसंत सालके व वैशाली पठारे या तीन सदस्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या विभाजन नंतर नगर-पुणे रोडवरील सुपा येथे पारनेर तालुका सहकारी दूध संघाचे कार्यालय व दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले होते. येथे संकलित होणाऱ्या दुधाचे महिन्यातून दोन वेळा पेमेंट केले जात होते. पुढे सुपा एमआयडीसीत खासगी दूध संकलन केंद्र सुरू झाल्याने सहकारी दूध संघ बंद पडला. मध्यंतरी अनेक राजकीय उलथापालथीत संघाचा कारभार प्रशासक, प्रशासकीय मंडळाकडे देण्यात आला. परंतु संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यात यश आले नाही. मात्र, निलेश लंके आमदार झाले व त्यांनी सहकारातील या कामधेनूला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न केले. दादासाहेब पठारे यांच्या माध्यमातून सत्तेवर आलेली त्रिसदस्यीय समिती व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने संघाचे रुपडे बदलले. दूध संकलन सुरू झाले. परंतु दादासाहेब पठारे यांचे निधन झाल्याने पुढच्या टप्प्यात नाशिक विभागीय उपनिबंधक सहकारी दूध संस्था यांनी संघाच्या प्रशासकीय समितीचा विस्तार करून त्यात तीन सदस्यांचा नव्याने समावेश केला. त्यामुळे आता अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सदस्य अशी ५ सदस्यीय प्रशासकीय समिती काम पाहणार आहे. माळकूप फाट्यावरील संघाच्या जागेवर लवकरच दूध संकलन सुरू करण्यात येणार असून त्याची तयारी जोरात सुरू असल्याचे अध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी सांगितले. त्या पाठोपाठ नारायणगव्हाण येथील संघाच्या केंद्रावर ही दूध संकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपाध्यक्ष सुरेश थोरात यांनी सांगितले.
तालुका संघातील दूध वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले. संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत ही प्रशासकीय समिती कामकाज पाहणार आहे. सध्या सहा महिन्यांचा कालावधी दिला असला तरी हा कालावधी जास्तीत जास्त वर्षभरापर्यंत वाढवण्याची त्यात तरतूद असल्याची माहिती अध्यक्ष रोहोकले यांनी दिली.