अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊनकाळातही मद्यप्रेमींनी तब्बल १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६४४ लिटर दारू रिचविली आहे. या माध्यमातून शासनाला १४ कोटी ७९ लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे.
कोरोनामुळे बहुतांशी व्यवसायांवर विपरित परिणाम होऊन आर्थिक उत्पादनात घट झाली आहे. दारू विक्रीवर मात्र काहीच परिणाम झालेला दिसत नाही. बहुतांशीकाळ दुकाने बंद राहिली तरी मद्यप्रेमींनी संधी मिळेल तेव्हा दारू खेरदी करत शासनाच्या महसुलात भर टाकल्याचे दिसत आहे. २०१९-२० च्या तुलनेत दारू विक्रीतून शासनाला २०२०-२१ मध्ये जास्त महसूल मिळाला आहे. कोरोनामुळे सध्या दारूचे दुकाने बंद आहेत. मात्र सकाळी ७ ते ११ या वेळेत दारूच्या घरपोहोच विक्रीला परवानगी आहे. या घरपोहोच विक्रीलाही मद्यप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिअरच्या तुलनेत जिल्ह्यात देशी-विदेशी मद्याची सर्वाधिक जास्त विक्री झाली आहे.
------------------------
महसूलला दारूचा आधार
जिल्ह्यात २०१९-२०मध्ये दारू विक्रीतून शासनाला १४ कोटी ५८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर २०२१ मध्ये १४ कोटी ७९ लाखांचा महसूल मिळाला आहे. दरवर्षी उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो.
------------
दोन वर्षांतील दारू विक्री
२०१९-२० : १४ कोटी ५३ लाख ५९ हजार ७११ लिटर
२०२०-२१ : १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६६६ लिटर
----------------
जिल्ह्यात वर्षभरात उत्पादन शुल्कच्या माध्यमातून अवैध दारू विक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर नियमित कारवाई होत असल्याने वैध दारू विक्रीच्या माध्यमातून शासनाला मिळणारा महसुलात वाढ होते. अवैध दारू विक्रीवर येणाऱ्या काळातही अशीच कडक कारवाई केली जाणार आहे.
- संजय सराफ, प्रभारी उपअधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग