अहमदनगर : स्थापनेचे ७५ वे वर्ष साजरे करणारे चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टच्या अमृतमहोत्सवी गणेशोत्सवास मोठ्या उत्साहात, पण साध्या पद्धतीने सुरुवात झाली. कोरोना काळात मनपाच्या लसीकरण केंद्रावर सेवा देणाऱ्या महात्मा फुले आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांच्या हस्ते निर्विघ्न गणेशाची प्रतिष्ठापना करून अनोखा उपक्रम राबविला. चौपाटी कारंजा चौकातील श्रीदत्त मंदिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी गाढे, सुपरवायझर अश्विनी जोशी, परिचारिका राजश्री धोंगडे, जयमाला शिंदे, अर्चना उमाप यांनी विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना केली. मंडळाच्या वतीने चारही आरोग्य सेविकांचा फेटे बांधून व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग व शाडू मातीपासून बनविलेल्या निर्विघ्न गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाचे व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
अमोल भंडारे म्हणाले, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने व नियमांचे पालन करत गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहोत. मंडळाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असला तरी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत. कोरोनाच्या दोन्ही लाटेच्या काळात आरोग्य सेविकांनी खंबीरपणे उभे राहून घरातील व आरोग्य केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पडल्या आहेत. त्यांचे कार्य पाहिल्यावर नर्सला सिस्टर का म्हणतात समजते. म्हणूनच त्यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करून या भगिनींच्या कार्याचा गौरव केला आहे.
यावेळी चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टचे महेंद्र ताकपिरे, महेश कुलकर्णी, सागर रोहोकले, विवेक भिडे, नाना भागानागरे, राहुल वरखेडकर, पुरुषोत्तम बुरसे, अरविंद मूनगेल, अक्रम पठाण, मयूर कुलकर्णी, श्रीपाद वाघमारे, तेजस वैद्य, अनिकेत पाटोळे, राजू बिडकर, प्रसन्न बिडकर, सूचित भळगट, मयूर जोशी, माणिक आव्हाड, शुभम वैराळ, भरत दरेकर व निल गांधी उपस्थित होते.
--------------------------------
फोटो – चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टच्या अमृतमहोत्सवी गणेशोत्सवाची सुरुवात आरोग्य सेविकांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे, महेंद्र ताकपिरे, महेश कुलकर्णी, सागर रोहोकले, विवेक भिडे, नाना भागानागरे, आदींसह सदस्य उपस्थित होते.