अहमदनगर : श्रावण मास सुरू होताच गृहखरेदीला उत्साह आला आहे. नवीन घर घेण्यासाठी अनेकांना श्रावण महिन्याचा मुहूर्त गवसला आहे. रिअल इस्टेट बाजारातील मंदी ओसरली असून, खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना तेजी आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा आनंदही द्विगुणित झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बांधकाम व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनाही मोठा फटका सहन करावा लागला. कोरोना काळात अनेकांचे गृहप्रकल्प रखडले. अनेकांचे उद्योगधंदे ठप्प असल्याने त्याचा परिणाम कामगारांवर झाला. त्यामुळे घरांची मागणीही घटली होती. दुसरी लाट कमी झाल्यानंतरही बाजारात फारसा उत्साह नव्हता. त्यात दुपारी चारपर्यंत निर्बंध असल्याने अनेक प्रकल्पांचे काम वेळेत न झाल्याने नववर्षात नव्या घरात जाण्याचे अनेकांचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यात अक्षयतृतीया, गुढीपाडवा असे अनेक मुहूर्त ग्राहकांना साधता आले नाहीत.
-------------
कोणत्या महिन्यात किती रजिस्ट्री (२०२१)
मार्च -११३५१
एप्रिल-२९१५
मे-२२१४
जून-७९२७
-------------
जिल्ह्यात रोज चारशे नोंदणी
जिल्ह्यात एका दुय्यम निबंधक कार्यालयात ३० ते ३५ दस्त नोंदणी होते. जिल्ह्यात १७ दुय्यम निबंधक कार्यालये असून, सरासरी रोज ४०० दस्त नोंदणी होते. त्यात गहाण खताची संख्या जास्त आहे. गृह खरेदी-विक्री व्यवहारही आता सुरू झाले आहेत, असे मुद्रांक जिल्हाधिकारी व्ही. एस. भालेराव यांनी सांगितले.
------------
म्हणून वाढल्या घराच्या किमती
प्लॉट- कोरोना काळानंतर आता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले
सिमेंट-गेल्या काही वर्षांमध्ये सिमेंटच्या दराने चारशेचा टप्पा गाठला
वीट-कोरोनानंतर बांधकामाला गती मिळाल्याने विटांच्या किमती वाढल्या
वाळू- मागील दोन-तीन वर्षांपासून वाळू लिलाव बंद असल्याने वाळू महाग झाली आहे.
---------
गृह प्रकल्पाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड आहे.
-अशोक औशीकर, नागरिक
-----
विविध बँकांकडून कर्ज मिळत आहे; परंतु हे कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे नसल्यानेदेखील सर्वसामान्य घर घेण्यापासून वंचित राहत आहेत.
-दर्शन घोरपडे, सावेडी
---------
गुंतवणूक म्हणून घर घेणारे अधिक
बहुतांश घर घेणाऱ्यांचे उत्पन्न हे सरासरी ७० हजार ते १ लाख रुपये महिना असे असते. त्यामुळे काहीजण प्रत्यक्षात घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करतात. बहुतांश नागरिकांकडून गृह प्रकल्पांमधील गुंतवणूक ही भविष्यात आणखी लाभ देईल, अशी अपेक्षा ठेवूनच ते गुंतवणूक करतात.
----------