कोपरगाव : विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता एकूण तीन टप्प्यात राज्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून गुरवारी ( दि.१ एप्रिल ) कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध केला. तसेच नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या नगरपरिषद आस्थापनेवरील व राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी यांचे वेतन सध्याची सहाय्यक अनुदानाची पद्धत बंद करून थेट कोषागारातून करावे,सर्व कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणाली लागू करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, पदोन्नती, मुख्याधिकारी पदभार पात्र अधिकारी यांना मुख्याधिकाऱ्यांच्या रजा कालावधीत देणे, सेवाविषयक लाभ वेळेवर देणे, आकृतीबंध सुधारित करणे, वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, कोविडमुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत मिळवून देणे, सफाई कामगारांना घरे बांधून देण्यासंदर्भात मागण्या आहेत. याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ , पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, लेखापाल तुषार नालकर, लेखा परीक्षक भीमराव संसारे, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे उपस्थित होते.
................