अकोले : आंबड-पाडाळणे घाटात डांबरी रस्त्याला मोठी भेग पडली असून, रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास १ कोटी १० लाख रुपये खर्चून तयार झालेला हा रस्ता जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.आंबड ते पाडाळणे घाटमाथा अशा चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महिन्यापूर्वी झाले असून पहिल्याच पावसाने घाट वळणावर रस्ता खराब झाला आहे. साईड पट्ट्याचे काम झालेले नाही, तर काही ठिकाणी साईड गटार गरचेची असताना ते काम न झाल्याने रस्त्यावरुन पाणी वाहिल्याने डांबर उघडे आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद असून मोठी गाडी आल्यावर मोटरसायकल पास व्हायला भितीदायक आहे. घाटात थातूरमातूर डोंगराची डागडुजी करण्यात आली आहे. डोंगराचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य साईड गटारी झालेल्या दिसत नसल्याने परिसरातील नागरिक याबाबत जाहीर तक्रार बोलून दाखवत आहेत. घाटात डांबरी रस्त्यासह भराव्यास भेगा गेल्या आहे. काही ठिकाणी भराव खचू लागला आहे. तीव्र उताराच्या घाट भागातच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी) रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. परंतु दखळ घेतली गेली नाही. महिनाभरातच रस्ता उखडू लागला आहे. घाटात भेग पडली असून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने पाडाळणे शेलद भागातील प्रवाशी घाटातून प्रवास करणे टाळत आहे.- नाथू भोर, सरपंच आंबड
आंबड-पाडाळणे घाटात रस्त्याला भेगा
By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST