केडगाव : मुळा धरणाचे पाणी लिप्टद्वारे नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीत टाकण्यात यावे यासाठी अकरा गाव पाणी योजना संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळविण्याचा निर्धार करण्यात आला. याबाबत डोंगरगण येथे ११ गावचे सरपंच व निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक नुकतीच पार पडली.
मुळा धरणाचे पाणी लिप्टद्वारे उचलून इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, जेऊर परिसरातील डोंगरात फिरवून बंधारे, तलाव भरण्याबाबत तसेच डोंगरगण, मांजरसुंबा गड, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी या गावांनी अशाच पद्धतीने पाणी फिरवून बंधारे, तलाव भरण्याबाबतचा हा प्रकल्प आहे. पिंपळगाव तलावात पाणी सोडून ते धनगरवाडी, शेंडी, पोखर्डी या गावांसाठी उपयोगात आणता येईल.
पिंपळगाव तलावातून आजमितीला डोंगरगण, जेऊर, धनगरवाडी, मांजरसुंबा गड या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन आहेत. उन्हाळ्यामध्ये या तलावात पाणी सोडल्यास आसपासच्या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी संजय पटारे यांची निवड करण्यात आली तर योजनेच्या लाभार्थी अकरा गावांचे विद्यमान सरपंच उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. खजिनदारपदी वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे यांची निवड करण्यात आली.
हा परिसर पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. सदर प्रकल्प राबविल्यास परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी वडगाव गुप्ता सरपंच विजय शेवाळे, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, ससेवाडी सरपंच दत्तात्रय जरे, डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, अण्णासाहेब मगर, जेऊर माजी उपसरपंच बंडू पवार, बाबासाहेब मगर, आदिनाथ बनकर, सर्जेराव मते, लक्ष्मण तोडमल, मोहन लामखडे यांच्यासह लाभार्थी गावांचे सरपंच व प्रतिनिधी उपस्थित होते.
-----
अकरा ग्रामपंचायतींचे करणार ठराव..
याबाबत सर्व अकरा ग्रामपंचायत ठराव घेऊन लवकरच मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी वेळप्रसंगी आंदोलन उपोषण अथवा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.