कर्जत : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी व बंदोबस्तासाठी तैनात केलेले अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत.
तहसीलदार नानासाहेब आगळेे व निवासी नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे यांनी नियोजन केले आहे. १९२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी १९२ पथके मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व साहित्य घेऊन एसटी बस व स्कूल बसने १ हजार ६५ कर्मचारी रवाना झाले आहेत. शिवाय आठ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी संवेदनशील गावात उमेदवार, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोठे काय घडले तर संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंदोबस्तासाठी १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस कर्मचारी, ७४ होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त रवाना झाला आहे. शिवाय तत्काळ कारवाईसाठी ५ मोबाईल व्हॅन, आवश्यक अशा १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.
(फोटो १४ कर्जत पोलीस)
कर्जत तालुक्यातील मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांना सूचना करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव.