अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार देत राजीनामे दिले.
जिल्हा परिषदेला डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांतील अनेक पदे रिक्त राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेत एमबीबीएस डॉक्टरांच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून वर्षभरात २२ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यापैकी १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले. या डॉक्टरांची ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी राजीनामे दिल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७ डॉक्टरांच्याही नियुक्त्या जिल्हा परिषदेत केल्या गेल्या. यापैकी १३ डॉक्टर सध्या कार्यरत असून, उर्वरित ४ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती केली. आरोग्य विभागाने कोरोनाकाळात ७२ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती असून, यापैकी ५५ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १७ बीएएमएस डॉक्टरांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१३ पदे आहेत. या पदांवर कायमस्वरूपी नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी असते; परंतु त्यापूर्वीच अनेक जण सोडून जातात. त्यामुळे पदे रिक्त होतात. रिक्त झालेल्या पदांवर तातडीने जाहीरातीव्दारे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे पदे रिक्त झालेली नाहीत. आरोग्य सेवा खंडित होणार नाही, यासाठी ही काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
....
कोरोनाकाळातील नियुक्त्या
जिल्हा प्रशासनाकडून - २२
नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७
बीएएमएस- ७२
...
हजर झालेले -७५
राजीनामे दिलेले -३६
......
अभ्यासाचे कारण देत राजीनामा
जिल्हा परिषदेत कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील शिक्षण सुरू असून, अभ्यास करण्यासाठी राजीनामा देत आहे, असे कारण बहुुतांश डॉक्टरांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.
....
जिल्हा परिषदेत एकही पद रक्त नाही
कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने बीएएमस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यामुळे या काळात जिल्हा परिषदेचे एकही पद रिक्त नाही. कोरोना नसताना पदे रिक्त होती; परंतु कोरोनाकाळात आरोग्य सेवा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने डॉक्टरांची भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
....