जामखेड : भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा जामखेड शहरातील मेनरोडवरील एका जनरल स्टोअर्ससमोर आरोपीची भाची तिच्या नणंदेसह उभी होती. त्यावेळी आरोपीने भाचीच्या नणंदेचा हात पकडत ‘तुझ्या भावाने माझ्या भाचीला पळवून नेले आहे, आता मी तुला पळवतो’, असे म्हणत ओढले. तसेच दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर दोघींनी रात्री जामखेड पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.संबंधित तरुणी हीचे जामखेड शहरातील एका तरुणावर प्रेम होते. दोघांनीही आळंदीला जाऊन आंतरविवाह केला. २१ जून रोजी दोघांनीही नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर संबंधित आरोपी वारंवार मुलाच्या नातेवाईकांना धमकी देत होता. त्याच्या धमकीला कंटाळून भाचीच्या सासरच्या लोकांनी संबंधित आरोपीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही तक्रार देण्यात आली होती. रविवारी आरोपीने भाचीसह तिच्या नणंदेलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी. आय. गव्हाणे हे करत आहेत.
आंतरजातीय विवाह केल्याने मामाने भाचीला केली बेदम मारहाण; जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:52 IST