अकोले : सरकार नुसती घोषणाबाजी करत असून, भारत माता की जय, असं म्हणून दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी द्यायला हवा, तसेच शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले. दूध, कांदा व पाणी टंचाई प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनिमित्त समशेरपूर येथे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार वैभव पिचड, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, सभापती अंजना बोंबले, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर आदी उपस्थित होते. पीक विम्याचा अकोले तालुक्याच्या वाट्याला एक छदामही आला नाही. निळवंडेला केवळ ३ कोटी मिळाले असून सरकारला निळवंडे धरणाचा साठवण तलाव करायचा विचार दिसतो. कालव्यांसह निळवंडे पूर्ण करण्यासाठी भरीव निधी न दिल्यास पुढच्या वर्षी निळवंडेतून थेंबभर पाणी लाभक्षेत्राकडे जाऊ देणार नाही, असा इशारा पिचड यांनी दिला. निळवंडेसाठी निधी मिळवून देतो, असे म्हणणारे भाजपा, सेनेचे खासदार कुठे गेले? असा सवाल उपस्थित करत युतीच्या थापाड्या पुढाऱ्यांना जवळ उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. निळवंडेच्या लाभक्षेत्रातील आमदारांना झोप लागली की काय? असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, परबत नाईकवाडी, के. बी. दराडे, पोपट दराडे, काळू भांगरे, कोंडाजी ढोन्नर, मीनानाथ पांडे, सोमनाथ मेंगाळ, रामनाथ सहाणे यांची भाषणे झाली. कासम मणियार यांनी सूत्रसंचालन, तर सचिन दराडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
‘भारत माता की जय’ म्हटल्याने दुष्काळ हटणार नाही
By admin | Updated: April 11, 2016 00:33 IST