तालुक्यातील पढेगाव शिवारात एका विहिरीत गुरुवारी २१ वर्षीय पूजा सागर मापारी या विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मयताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्यूबद्दल संशय असल्याने मयतेच्या वडिलांनी विजय बाळकृष्ण भुजाडे (वय ४२, गोधेगाव, ता. कोपरगाव) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत पूजा हिचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर तिचा लगेचच मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. तिला सतत दमदाटी व मारहाण केली जात होती. तसेच पती सागर याचे विवाहबाह्य संबंध होते असे फिर्यादीत म्हटले आहे. सासरच्या व्यक्तींनी सतत पैशासाठी तगादा लावल्याचा आरोप मयत पूजा हिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे मयत ही तणावाखाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे अधिक तपास करत आहेत.
---