अहमदनगर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती तसेच शासकीय कार्यालयांवर उभारण्यात येणाऱ्या शिवगुढीवर शासनाने आता परिपत्रक काढून पालथा तांब्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला छावा संघटनेचा विरोध असून तो निर्णय रद्द करण्याची मागणी संघटनेने जिल्हा प्रशासनाने केली आहे.
६ जूनला शिवराज्याभिषेक दिन या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायचे ठरविले आहे. तसे परिपत्रक १ जानेवारी २०२१ ला प्रसिद्ध केले असून त्या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयांवर भगव्या ध्वजाची गुढी उभारावी, असा आदेश पारित केला. त्यानंतर १२ मे २०२१ रोजी शुद्धीपत्रक काढून यात गुढी म्हणजे भगवा झेंडा असा शब्दप्रयोग करण्यात आला असून पुन्हा १ जून २०२१ ला नवीन परिपत्रक काढून भगव्या ध्वजावर पालथा तांब्या ठेवण्याचे नमूद केले. त्याला गोंडस नाव सुवर्णकलश असे देऊन शिवरायांच्या भगव्या ध्वजाचा एकप्रकारे अपमानच केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक दिनी कोणत्याही भगव्या ध्वजावर सुवर्ण कलश पालथा घातला नव्हता. म्हणून आपण काढलेल्या या परिपत्रकात बदल करावा, भगव्या ध्वजावर पालथा तांब्या अथवा सुवर्णकलश ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला द्याव्यात, अन्यथा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन पठारे आदींनी दिला आहे.
------------
फोटो मेलवर
०४छावा संघटना
शिवराज्याभिषेक दिनी उभारण्यात येणाऱ्या गुढीवर पालथा तांब्या ठेवण्याबाबत शासनाने काढलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.