जामखेड : गणेशोत्सवासाठी बळजबरीने कोणीही वर्गणी जमा करू नये, गणेशाची आरती करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे, मिरवणुका काढू नयेत, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत गायकवाड यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत गायकवाड म्हणाले, जामखेड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व पोलीस पाटील, सर्व सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, गणेश मंडळे अध्यक्ष व उपाध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, सर्व मूर्तिकार बंधू, सर्व प्रकारचे वाद्य चालक, महिला दक्षता समिती आदींनी आपल्या भागातील गणेश मंडळांवर नियंत्रण ठेवून पुढील सूचनांचे पालन करून घ्यावे.
गणेश मंडळाने स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक जागेवर मंडप लावण्याची परवानगी, जागेचे ना हरकत व वीज जोडणीचे प्रमाणपत्र घेऊन जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सर्व कागदपत्रे सादर करून परवानगी घ्यावी व नंतरच मूर्तीची स्थापना करावी, असे त्यांनी म्हटले आहे.