अहमदनगर : विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटकच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. बागडपट्टी येथील विडी कंपनीने विडी कामगारांना बुधवारी (दि. १०) मजुरी देण्यास सुरुवात केली, अशी माहिती आयटकचे जनरल सेक्रेटरी सुधीर टोकेकर व उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली यांनी दिली.
शहरातील बागडपट्टीत एका विडी कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. शहरात इतर ठिकाणीही त्यांच्या शाखा आहेत. या विडी कंपनीने विडी कामगारांची मजुरी थकवल्याने त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला होता. विडी कामगार महिलांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत होते. संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत संबंधित कंपनी व्यवस्थापकाने दुपारनंतर विडी कामगारांना मजुरी देण्यास सुरुवात केली. मजुरी मिळाल्याने विडी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगर शहरात अन्य चार ते पाच विडी कारखाने असून, त्यांच्याकडून वेळेवर मजुरी दिली जाते. मात्र, बागडपट्टीतील विडी कारखान्याने मजुरी थकवल्याने विडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मजुरी किमान वेतन कायदा १९६३नुसार वेतन वेळेवर देणे ही मालकाची जबाबदारी आहे. सध्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. विडी संघटना व कारखानदारांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्यानेच हे आंदोलन करण्यात आले होते.
--
फोटो- ११ विडी कामगार