घारगाव : वातावरण, खराब हवामान यामुळे आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आंब्यावर भुरी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, खवले कीड, तांबडा कोळी, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मोहराचा फुलोरा कोमेजून जाऊन गळत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगावसह परिसरात शेतकऱ्यांनी शेतात केशर, हापूस, आंध्रच्या बदाम, तोतापुरी, वनराज, रत्ना आदी वेगवेगळ्या जातींच्या आंब्याची लागवड केली आहे. यावर्षी हवामानात व वातावरणात अनेक बदल होत गेले. पाऊसही योग्य प्रमाणात झाला. समुद्र किनाऱ्यावरून खारे वारे वाहू लागले की मोहर येण्यास सुरुवात होते. दरवर्षी आंब्याच्या झाडांना फेब्रुवारी महिन्यात मोहर येण्यास सुरुवात होते; परंतु घारगाव व आजूबाजूच्या परिसरात यंदा लवकरच डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहर आला असून, अजून काही प्रमाणात मोहर फुटत आहे. काही ठिकाणी छोट्या आकाराची फळे लागली आहेत.