श्रीगोंदा : तालुक्यातील घोड, भीमा नदीकाठावरील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत ई-पीक पाहणी नोंद, वाळूसाठे लिलाव, दगड, खाण याबाबत चर्चा होणार आहे. याबाबतचे आदेश प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी काढले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात ११६ महसुली गावे आहेत. यामध्ये ८६ ग्रामपंचायती आहेत. कोरोनाचे सावट असताना ई पीक ॲपद्वारे नोंद करणे व वाळूसाठे लिलाव, दगड, खाण पट्टा हे विषय चर्चिले जाणार आहेत. वाळूसाठे लिलावाबाबत मागील दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत चर्चा झाली. १८ पैकी १५ ग्रामपंचायतींनी वाळूसाठ्याचा लिलाव करू नये, असे ठराव केले. तीन गावांनी वाळू लिलावाला हिरवा कंदील दाखविला होता.
पेडगाव, अजनूज, आर्वी, अनगरे, निमगाव खलू, कौठा, सांगवी, काष्टी, वांगदरी, डोमाळेवाडी, राजापूर, गार, वडगाव शिंदोडी, म्हसे, दाणेवाडी या १५ ग्रामपंचायतींमध्ये वाळूसाठे लिलावाबाबत फेरचर्चा होणार आहे. बोरी, गव्हाणेवाडी, हिंगणी या गावांनी यापूर्वीच वाळूसाठे लिलावास होकार दिला आहे.